Phone : 02162-238713, 9637077152

yashashree.dental@gmail.com

श्वासाचा ताजेपणा कसा टिकवावा?

Home   >   Blogs


img

आपण नेहमी वाचतो/ऐकतो की मौखिक स्थिती म्हणजे आपल्या आरोग्याचा आरसा.. म्हणजे असं की आपलं एकूण आरोग्य व त्याचे लक्षणं ह्यांचा अंदाज मौखिक तपासणीत येतो. ह्यात श्वासही आलाच. श्वास तजेलदार असेल तर आपण उत्साही आनंदी आणि आत्मविश्वासू असतो आणि तसेच आपण एकूण आरोग्य स्थिती टिकवून असूत तर श्वास ताजा तजेलदार राहतो. काय आहे श्वासाचं असं गुपित? तर आपण श्वासासंबंधी महत्वाची पण सोपी माहिती पाहूयात.


श्वास जर मोकळा आणि ताजा असेल तर व्यक्तिमत्वाला एक विशेष प्रतिभा आणि विश्वास प्राप्त होतो. बोलण्यात एक प्रभावी छाप पडते. आणि जर ह्याउलट स्थिती असेल तर आपणच बोलणं/व्यक्त होत नाही किंवा बोललोच तर समोरचा व्यक्ती आपल्याशी बोलण्यास उत्सुक नसतो. असं थेट व्यक्तिमत्व वाढवणारा एक अविभाज्य घटक म्हणून श्वासाकडे पाहिलं जातं. ह्यात, श्वासाला ताजा आणि तजेलदार ठेवण्यास कोणत्या बाबी कार्य करतात? तर आपली दैनंदिन मौखिक निगा, हिरड्यांचा जंतू प्रादुर्भाव, दातांना असलेल्या किडीमुळे, दातांमध्ये अडकणार्या अन्नकणामुळे, सततच्या श्वासमार्गाच्या संसर्गामुळे , पचनासंबधी तक्रारींमुळे, मधुमेह अथवा इतर शारीरिक आजारांमुळे, काही व्यसनांमुळे आपण श्वासविकाराला शिकार होतो. ह्यात एक एक कारणांचा आपण विस्ताराने विचार करू.


दैनंदिन मौखिक निगा : आपण स्वच्छतेबाबत रोज घेत असलेली काळजी, जसे की व्यवस्थित ब्रश करणे, आवश्यक वेळी चुळ भरून तोंडाची नीट स्वच्छता ठेवणे, जिभेवरील शिल्लक अन्नकणाचा थर धुवून काढणे , इ. ह्या नियमित सवयीमुळे तोंडात कुठल्याही प्रकारे दुर्गंधी उत्पन्न होत नाही आणि श्वास ताजा राहतो.


हिरड्यांना असणारा जंतू प्रादुर्भाव..: आपण व्यवस्थित स्वच्छता ठेवून देखील आपला श्वास तजेलदार राहत नसेल तर बहुतांश वेळा हिरड्यांचा आजार असण्याची शक्यता असते, उदा. पायोरिया. ह्यात हिरड्यांना असणाऱ्या संसर्गामुळे हिरड्यांखाली पु जमा होतो आणि श्वासाचा ताजेपणा हरवून बसतो, दर्पयुक्त दुर्गंधी सुटते, बोलतांना समोरच्याला खूप त्रास होतो त्यामुळे लोक टाळायला लागतात. योग्य उपचार घेऊन पायोरिया पूर्णतः दुरुस्त होऊन आपण श्वास पूर्ववत तजेलदार करू शकतो. दंत वैद्याने सांगितलेल्या सूचनांचे पालन करून अश्या संसर्गाला कायमचा अटकाव करता येणे सहज शक्य असते.


दातांमध्ये असणारी कीड आणि त्यात अडकून राहणाऱ्या अन्नकणामुळे श्वास बिघडतो. एक जागी साठून राहिलेले अन्नकण, विशेषतः पिष्टमय पदार्थ कुजल्याने श्वासास दुर्गंधी उत्पन्न होते. तेव्हा असे अन्न अडकणाऱ्या जागांचा बंदोबस्त वेळीच करून घ्यायला हवा. काही रुग्णांमध्ये लाळेची मात्रा कमी प्रमाणात असते, अश्यावेळी नैसर्गिक स्वच्छता पुरेशी न झाल्याने दातात जागोजागी अन्न चिटकून राहते आणि मग परिणामी श्वास बिघडतो. करिता नियमित तपासणी करून घेऊन अशी काही कारणं नाहीत ना , ह्याची खात्री करून घ्यावी, असल्यास योग्य उपचार घ्यावेतच.


बऱ्याचदा असे आढळून येते की कमी प्रतिकारशक्ती असल्यामुळे रुग्णांना वारंवार सर्दी पडसे होत असते, अश्या वेळी नाकाने श्वास घेणे कमी अथवा बंद होऊन तोंडावाटे श्वास चालतो. ह्यामुळे तोंडाला कोरडं पडते, नैसर्गिक रित्या होणारी मौखिक स्वच्छता होत नाही, घशात जिवाणू संसर्ग होत राहतो आणि मग श्वासाचा तजेलदारपणा राहत नाही. श्वास मोकळा राहत नाही. अश्या प्रसंगी योग्य औषधोपचार घेऊन निरामय राहत येते. कधी कधी खोल फुफ्फुसाच्या आजारांमुळे श्वासदुर्गंधी उत्पन्न होते, दंतवैद्य हे ही कारणं शोधण्यात तज्ञ असतात. त्यांकग्या मार्गदर्शनाखाली कारणांचा शोध घेऊन वेळीच योग्य बंदोबस्त करणे हिताचे ठरते.


आजकाल सामान्यतः दिसणारा आजार म्हणजे मधुमेह. रक्तातील अनियंत्रित साखर पातळीमुळे एक मेडिकल इमर्जन्सी उद्भवते, डायबेटिक किटो असिडोसीस. खूपवेळा रुग्णाच्या श्वासात असलेल्या विशिष्ट वासावरूनच प्रथम किटो ची शंका येते आणि मग त्या दिशेने तपासण्या केल्या जातात. म्हणून, आपल्या श्वासात झालेल्या बदलाची वेळीच कारणमीमांसा करणे आवश्यक ठरते.


केवळ तोंड अथवा श्वसन मार्ग ह्यातीलच कारणांनी श्वास दुर्गंधीयुक्त होतो असे नाही तर पचनसंस्थेचे आजारही ह्याला कारणीभूत ठरू शकतात. सारखे होणारे अपचन तसेच अगदी दुर्मिळ केसेस मध्ये बद्धकोष्ठता हे देखील श्वास दुर्गंधीचे कारण ठरते. योग्य वेळी योग्य उपायांनी आपण निरोगी तसेच ताजातजेलदार श्वास अनुभवत राहू शकतो.


असा, श्वासाचा फ्रेशनेस बहुआयामी असून आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा आहे. दंततज्ञ हे श्वास आरोग्य टिकविण्यासाठी खूप मोलाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या नियमित मार्गदर्शनाखाली आपण प्रभावी व्यक्तिमत्व कायम ठेवू शकतो. नियमित दखल - स्वच्छ तजेलदार श्वास. आत्मविश्वासाने पास पास.👍


Top