Phone : 02162-238713, 9637077152

yashashree.dental@gmail.com

आई होण्याआधी जाणून घ्यावं असे निरोगी दातांचे रहस्य!

Home   >   Blogs


alt

ऑक्टोबर महिना होता तो. बाहेर लवकर अंधारून आलेलं क्लिनिक बंद करून घरी जायचे वेध लागले होते. क्लिनिक बंद करायची तयारी करत होते, तेवढ्यात माझी रिसेप्शनिस्ट धावतच केबिन मध्ये आली. 'मॅडम, दहा मिनिटं थांबता का जरा प्लिज? एका पेशंटला अर्जट चेक-अप ला वेळ दिली आहे मी." , "आत्ता?" आश्चर्यने मी विचारले.


"फारच जास्त वेदना होत होत्या‌ त्यांना‌, म्हणून वेळ दिली आत्ताची आणि तुमची आधीची पेशंट आहेत ती! " धीर करून रिसेप्शनीस्ट म्हणाली.


कितीही उशीर होत असला‌ तरी माझ्यातला डाॅक्टर थांबणारच होता.


दहा पंधरा मिनिटांनंतर, वेदनेने व्याकूळ झालेली 'ती' क्लिनिकमध्ये पोहचली.


तिला‌ बघताच लक्षात आले, माझी एक जूनी पेशंट 'प्रियांका' होती ती.


असह्य‌ वेदनांनी ग्रासलेली, चटकन जाणवलं की कदाचीत चार पाच महिन्यांची गरोदर असावी.


दोन-तीन वर्षांपूर्वीही अश्याच असह्य वेदनांमध्ये ती क्लिनीकला आली होती. तेंव्हांच्या त्या उपचारानंतर, दातांच्या दुखण्यातून तात्पुरता आराम मिळाला तिला, पण मधल्यावर्षात‌ कधीच, कसल्याच चेक-अपला आलेली आठवेना.


तेंव्हा दिलेल्या औषधांमुळे,‌केलेल्या उपचारानंतर थांबलेल्या दुखण्यानी परत डोकं काढलं होतं बघूदा! निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष केल्यावर उद्भवणारी ही स्थिती डाॅक्टर म्हणून मला नवीन नव्हती.


विचारांचं जाळं दूर करत, तपासणीसाठी मी मास्क चढवतानाच प्रियांका म्हणाली "मॅडम, एक्स्ट्रीमली सॉरी! मला त्रास होतो तेंव्हाच येते मी नेहमी.शिवाय तुम्ही दिलेल्या सल्ल्याचं महत्त्व मला आत्ता लक्षात येतयं. मी नियमीत उपचार, चेक-अपला पण आले नाही कधी, खरं सांगायचं तर, तुम्ही सांगीतली होतीत, तशी दातांची काळजी आणि‌ निगाही राखली नाही. पण कदाचीत त्यामुळेच, आता प्रेग्नंट असताना मला 'हा' त्रास सहन करावा लागतोय. मी आता आवश्यक तो बदल करेन, मॅडम,‌ तुम्हाला बघूनच फार धीर आलाय मला! माझ्यासाठी उशीरा पण थांबलात तुम्ही, थॅंक्यू! "


मी फक्त‌ तिच्या खुर्चीवर ठेवलेल्या हातावर हात ठेवून , स्मितहास्य केलं


डेंटिस्ट म्हणून वीस वर्षाच्या व्यवसायात वेगवेगळ्या पेशंटवर उपचार करण्याचा अनुभव मिळाला. दाताच्या उपचारासाठी आलेल्या पेशंटमध्ये गरोदर असणाऱ्या


स्त्रियांच्याही समावेश असतो.


त्याबद्दल आवर्जून सांगायला हवेत असे हे मुद्दे!


गरोदरपण हे स्रीआयुष्याचं एक अत्यंत नाजूक तितकंच जोखमीचं वळण. ह्या दरम्यान स्त्रीला सृजनासाठी निसर्गाने खूप समर्थ बनविलेले असते. पण काही वेळा स्त्रीचं शरीर आधीच काही तडजोडीचं आरोग्य असलेलं असेल तर मग काही बाबीवर जाणूनबुजून लक्ष ठेवायला पाहिजे म्हणजे गरोदरपणात तसेच प्रसूतिदरम्यान काही त्रास होत नाही. त्यातलीच एक आवर्जून दखलपात्र बाब म्हणजे दातांचे आरोग्य.


गरोदरपणात अगदी सुरवातीच्या टप्प्यापासून दातांशी निगडित समस्यात वाढ होऊ शकते त्याची काही कारणं म्हणजे, उलटीद्वारे होणारा आम्ल द्रवाचा मारा, लाळेची कमी झालेली प्रतिकारशक्ती, शरीरात रक्त घटकात कमी आल्यामुळे कमी होणारी प्रतिकारशक्ती, संप्रेरकात ( हार्मोनल ) होणारे बदल, आहाराचे बदल, अपुरी झोप, तसेच हिरड्यांच्या गरोदरपणातील कालावधीच्या विशिष्ट समस्या इ इ


ह्यात अगदी गरोदरपणाच्या नियोजनापासूनच दातांच्या आरोग्याविषयी जागरूक राहणे महत्वाचे आहे. नियोजनपूर्व दातांच्या डॉक्टरां कडे तपासणीसाठी जाऊन स्वच्छता तसेच इतर छोटी मोठी दातांची लागलेली कीड ह्यावर इलाज केला म्हणजे गरोदरपणाच्या काळात दातांसाठी दवाखान्यात जाण्याची वेळ येत नाही. गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात जेव्हा गर्भ पूर्ण आकार घेण्याच्या प्रक्रियेत असतो तेव्हा औषधी तसेच उपचार करण्यासाठी खूप मर्यादा येतात, अश्यावेळी गैरसोय टाळण्यासाठी दातांच्या तक्रारी आधीच संम्पवलेल्या सोयीचं ठरतं. जर दात दुखत असेल किंवा सूज वगैरे समस्या आलीच तर चार, पाच व सहाव्या महिन्यात उपचार शक्य होतात ते देखील कमी कमी वेळात करावे लागतात. अश्यावेळी व्हिजिट्स वाढतात. शिवाय आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सरे घेताना घ्यावयाची विशेष काळजी. दातांचे डॉ अश्या वेळी रुग्णाला व बाळाला क्ष किरणांचा उपद्रव होऊ नये म्हणून एक खास तयार केलेले लेड शिल्ड वापरतात, आणि मग एक्स रे द्वारे तपासणी करतात. आधुनिक उपचार पद्धतीत आता खूप कमी एक्सरे प्रतिमा घ्याव्या लागतात, त्यादेखील विशेष काळजी घेत जोखीममुक्त घेतल्या जातात.


सुरवातीला, उलट्या होण्याच्या कालावधीत दातांचे इनँमल झिजून दातांना थंड गोड पदार्थ झोंबण्याचा त्रास संभवतो. अश्या प्रसंगी उलटी झाल्यावर भरपूर साध्या पाण्याने गुळण्या करून पूर्ण आम्ल द्रव धुवून काढायला पाहिजे, दात स्वच्छ करण्यासाठी फ्लूओराईड युक्त टूथपेस्ट वापरायला पाहिजे, आणि स्वच्छता विशेष ठेवायला पाहिजे.


गरोदरपणाच्या काळात उदभवणारी दुसरी समस्या म्हणजे हिरड्यांचे आजार. काही कालावधीसाठी कमी झालेली प्रतिकारशक्ती, रक्तक्षय, जास्तीचे गोड पदार्थ खाणे, लाळेची संरक्षक क्षमता कमी होणे, दातांवर जॅम होणाऱ्या जंतूंच्या थराला शरीराची अतिरिक्त प्रतिक्रिया येणे इ एक अथवा अनेक कारणाने हिरड्या सुजणे, दुर्गंधी येणे, दात स्वच्छ करताना हिरडीमधून रक्त येणे, हिरडीत छोटूश्या गाठी उत्पन्न होणे हया समस्या येतात. तक्रारीच्या अगदी प्राथमिक अवस्थेत डॉ कडे गेल्यास दातांची सम्पूर्ण स्वच्छता करून ह्या त्रासापासून सहज आराम मिळतो. काही विशेष बाब म्हणून औषधोपचार गरजेचे ठरतात, ते डॉक्टर जोखीम बघून निर्णय करतात. समस्येच्या कारणाचा शोध घेऊन उपचार केला जातो. हिरडीच्या काही आजारांना उपचारानंतर पूर्ण प्रतिसाद मिळेलच असे कधी कधी होत नाही परंतु प्रसुतीपश्चात हिरड्या पूर्ववत होतात.


गरोदरपणात हिरडीमध्ये पू तयार होणे, दात हलणे अश्या समस्या असतील तर त्या दातांच्या आधार रचनेच्या गंभीर आजाराची शक्यता दाखवतात. ज्याला दन्तवैद्यकीय परिभाषेत 'सिव्हीअर पेरिओडोंटायटिस' म्हणतात. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात अगदी दुर्मिळ प्रकरणात हिरड्यांच्या अश्या आजारामुळे मुदतपूर्व प्रसूती झाल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे हिरडी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेतल्यास प्रसूतीची गुंतागुंत टाळता येऊ शकते....


तर अश्या सहज साध्य परंतु महत्वाच्या विषयाची माहिती आपणास उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.


धन्यवाद.
Top