Phone : 02162-238713, 9637077152

yashashree.dental@gmail.com

दुधाचे दात ..अर्थात निरोगी दातांचा पाया

Home   >   Blogs

img

मागच्याच शनिवारची गोष्ट आहे ,... वेदनेने विव्हळत असलेला ,उजवा गाल सुजलेला शुभम क्लिनिक मध्ये आला , अवघा तीन ते चार वर्षाचा असेल, दुधाच्या वीस दातांपैकी 15 ते 16 दात खराब झालेले होते, बरोबर आलेल्या पालकांना याविषयी कल्पना दिली त्यावर त्यांचे उत्तर होतं' काय करणार डॉक्टर , ऐकतच नाही तो.... दिवसातून चार ते पाच चॉकलेट तरी त्याला निश्चित पणे लागतात . हसावं की रडावं हेच मला कळेना . आणि त्यात दातांच्या स्वच्छतेचे ही ओरड ही होतीस ..गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये बराच वेळा हाच संवाद मला ऐकायला लागतो ... डॉक्टर! दुधाचे तर दात आहेत ना! पडणारच आहेत आणि त्यानंतर कायमस्वरूपी दात येणारच आहेत, बरोबर ना? एखाद्या अशिक्षित पालकाच्या तोंडून असा संवाद ऐकायला मिळणे ठीक आहे परंतु सुशिक्षित पालकांच्या तोंडूनही असं ऐकण निश्चितच वेदनादायी आहे. निसर्गाने निर्माण केलेले दुधाच्या दातांच महत्व निश्चितपणे काहीतरी असणारच असा का बर आपण विचार करत नाही?


चला तर मग याविषयी थोडसं जाणून घेऊया....


दुधाचे दात अनेक कारणामुळे निश्चितपणे महत्त्वाचे आहेत. मुलांच्या शारीरिक-,मानसिक आणि सोशल वाढीमध्ये हे महत्त्वाचे आहेत. दुधाच्या दातांची कशा पद्धतीने काळजी घ्यायला तुम्ही तुमच्या मुलांना ट्रेन करता, यावरच नंतर दुधाचे दात पडल्यानंतर उगवणाऱ्या कायम स्वरूपाच्या दातांची निगा तुमची मुलं कसे ठेवतात हे बरसच अवलंबून असतं... थोडक्यात दुधाच्या दातांचं आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही काय सवयी मुलांना लावतात, त्या सवयी मुले पुढे जाऊन परमनंट दातांची निगा राखण्यात follow करतात.

आपण आपल्या परमनंट दातांची जशी निगा राखतो त्याच पद्धतीने दुधाच्या दातांची सुद्धा निगा राखणं गरजेच आहे ..।चला तर मग त्या मागची आपण कारण जाणून घेऊ या


◆ दुधाचे दात परमनंट दातांना योग्य रित्या वर येण्यासाठी मार्गदर्शन करतात. थोडक्यात दुधाचे दात परमनंट दातांची जागा जबडा मध्ये राखून ठेवतात. दुधाच्या दातांच्या मुळा खाली ,जबडा मध्ये कायमस्वरूपी दात तयार होत असतात, नैसर्गिक रित्या दुधाचे दात पडल्यानंतर त्या ठिकाणी बरोबर कायमस्वरूपी दात उगवतात. जर आपण दुधाचे दात वेळे अगोदर काढले किंवा खराब झाल्यामुळे काढावे लागले तर खालून येणारे कायमस्वरूपी दातांची वाढ झाली नसल्यामुळे ते दात लवकर वर येत नाहीत, त्यामुळे शेजारील दात त्या जागेमध्ये सरकतात आणि त्या ठिकाणी येणाऱ्या कायमस्वरूपी येणाऱ्या दातांना योग्य ठिकाणी येण्यास अटकाव करतात, आणि त्यामुळे वेडेवाकडे दात येण्याची शक्यता अधिक बळावते.


◆ आपण पाहिलंच आहे की दुधाच्या दातांच्या मुळा खाली कायमस्वरूपी दात तयार होत असतात. दुधाचे दात आकाराने लहान असतात. दुधाच्या दाताला लागणाऱ्या किड् आपण योग्य वेळी इलाज करून घेतली नाही तर दातांची नस खराब होऊन मुळाच्या टोकाशी इन्फेक्शन होते, आणि असं वारंवार जर होत राहील तर निश्चितपणे खाली तयार होणाऱ्या कायम स्वरूपाच्या दातांमध्ये सुद्धा दाततयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो


◆ हे तर आपल्याला माहीतच आहे की चांगले चर्वण होण्यासाठी दातांची गरज असते. जर आपल्या मुलाच्या तोंडामध्ये दात व्यवस्थित असतील तर निश्चितपणे त्याला चांगले चावता येईल. मुलांची वाढ होण्यासाठी आवश्यक असणारे अन्नघटक हे त्याला मिळालेच पाहिजे. जर मुलांचे दात किडलेले असतील, त्यामध्ये अन्नपदार्थ अडकून बसत असतील, आणि पर्यायाने दुखत असतील तर निश्‍चितपणे मुलं जेवायला टाळाटाळ करतील, बरोबर की नाही? त्यांची वाढ होत असताना योग्य प्रमाणात आहार जर गेला नाही त्याचानिश्चित पणे परिणाम होणारच.. मग याचा विचार आपण पालक म्हणून करायला हवा की नाही?


◆ बोलण्यासाठी जिभ,ओठ,गाल त्यांचा परस्परांशी समन्वय असणे गरजेचे आहे. तसेच सुस्पष्ट उच्चार येण्यासाठी तोंडामध्ये सर्व दात असणे अतिशय गरजेचा आहे. जर ह्या समंन्वया मध्ये काही दात नसतील तर निश्‍चितपणे उच्चारां मध्ये फरक पडतो. चेहरा तयार होत असताना स्नायूंच्या जडणघडणीमध्ये दात महत्त्वाचा घटक आहे, ते तुमच्या चेहरा च्या स्नायूंना आधार देण्याचं काम करतात.


◆ जसजसे तुमचं मूल मोठं होत जातं तसं तसं दिसणं त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतच... समजा मुलाचे पुढचे दात पडले असतील तर निश्चितपणे आपण हसताना चांगले दिसत नाही हा न्यूनगंड त्याच्या मनामध्ये तयार होतोच, जर मुलांचे दात वारंवार दुखत असतील तर निश्चितपणे त्याच्या शाळेतील कॉन्सन्ट्रेशन वर परिणाम होतोच ,पर्यायाने त्याच्या अभ्यासावरही..।


थोडसं दुधाच्या दातांच्या जडणघडणीत बद्दल थोडं जाणून घेऊया


दुधाचे दात मूल सहा ते एक वर्षापर्यंत यायला सुरुवात होतात.. आणि सगळे दात साधारणपणे 3 वर्षापर्यंत येतात, एकूण दुधाच्या दातांची संख्या 20 असते,


दात येत असताना हिरड्या सुजणे, शिवशिवणे थोडंसं दुखणं हे नॉर्मल आहे, त्यामुळे बऱ्याचदा मुले काहीतरी उचलून हिरड्यांमध्ये चावण्याचा प्रयत्न करतात... असं काहीतरी अस्वच्छ तोंडात घातल्या मुळे बऱ्याचदा दात येत असताना जुलाब होणे यासारखे त्रास होतात. त्यामुळे हिरड्या शिवशिवत तर आपण व्यवस्थित स्वच्छ हात धुऊन हिरड्यांना मसाज करावा, आणि त्यातूनही मुलांना खूप त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवून घ्यावे.


आपल्याला हे तर माहीतच आहे की दुधाचे दात पडल्यानंतर त्या ठिकाणी कायमस्वरूपी दात येतात दुधाचे दात साधारणपणे सहा ते आठ वर्षापासून पडायला सुरुवात होतात. पण सगळेच दात एकदम पडत नाहीत सुरुवातीला पुढील पटाशीचे दात पडायला सुरुवात होते आणि दाढा सगळ्यात शेवटी दहा ते अकरा वर्षाच्या दरम्यान पडतात त्यामुळे दुधाचे दात त्या खालून येणाऱ्या कायमस्वरूपी दात येईपर्यंत टिकवणं खूप गरजेचं असतं.


आज आपण दुधाच्या दातांचं महत्व या विषयी थोडसं जाणून घेतल... त्याच प्रमाणे पुढील लेखांमध्ये दुधाच्या दातांची कशी काळजी घ्यायची, व्यवस्थित निगा कशी राखायची याबद्दल निश्‍चितपणे जाणून घेऊया.

धन्यवाद!
Top